Gosht Tashi Gamtichi 2 Successful Streak Sonal Production

146

Gosht Tashi Gamtichi 2 Successful Streak Sonal Production

Gosht Tashi Gamtichi 2 Successful Streak Sonal Production

नाट्यसृष्टीत नवनवीन विषयांवर भाष्य करणारी नाटके सादर करणाऱ्या नाट्यनिर्मिती संस्थेत सोनल प्रॉडक्शनचे नाव आवर्जून घेतले जाते.’गोष्ट तशी गमतीची’, ‘डोंट वरी बी हॅप्पी’, ‘परफेक्ट मिसमॅच’ यांसारख्या दर्जेदार नाटकांची निर्मिती करणाऱ्या या संस्थेने अल्पावधीतच रंगभूमीवर विशेष ओळख निर्माण केली. सोनल प्रॉडक्शनच्या या यशस्वी प्रवासात नाट्यकलाकार, लेखक आणि दिग्दर्शकांसोबतच बॅकस्टेज आर्टिस्ट यांचाही मोलाचा वाटा आहे. या सर्वांना धन्यवाद देता यावं यासाठी सोनल प्रॉडक्शनच्यावतीने दादरच्या सूर्यवंशी सभागृहात नुकताच एक छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला. या समारंभाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘गोष्ट तशी गमतीची पार्ट- २’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांसमोर येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

सोनल प्रॉडक्शन निर्मित सध्या गाजत असलेल्या नाटकातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभाचे प्रास्ताविक लीना भागवत यांनी केले. मंगेश कदम यांनी सोनल प्रॉडक्शनसोबतचे आपले ऋणानुबंध उपस्थितांसमोर मांडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामार्फत बेकस्टेज आर्टिस्टचा सत्कार करण्याचा हा पहिलाच उपक्रम सोनल प्रॉडक्शनने नाट्यसृष्टीत रुजू केला आहे. या संस्थेच्या यशस्वी घोडदौडीत मोलाचा हातभार लावणारे कमल शेडगे, समीर हंपी आणि सतीश खौतोडे या पडद्यामागील कलाकार तसेच व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रतीसात्मक सत्कार करण्यात आला.
गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच ११ एप्रिल २०१३ रोजी सोनल प्रॉडक्शनची स्थापना झाली होती. या संस्थेने अखियोंके झरोखोंसे या ऑर्केस्ट्रापासून सुरुवात केली. या ऑर्केस्ट्राची खासियत म्हणजे हा शो संपूर्णपणे अंध कलाकारांनी सादर केला होता. गायक, वादक असे मिळून २० अंध कलाकारांनी मिळून सादर केलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळाला. या ऑर्केस्ट्रापासून सोनल प्रॉडक्शनची झालेली यशस्वी सुरुवात आजपर्यंत अखंड चालू आहे. या नंतर ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक ३ ऑगस्ट २०१४ रोजी रंगभूमीवर आणले गेले. शशांक केतकर, मंगेश कदम आणि लीना भागवत यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाचे आतापर्यंत यशस्वी ३११ प्रयोग झाले आहेत. शिवाय कॅनडा, लाॅस अँजेलिस, दोहा, दुबई, ऑस्ट्रेलिया, मस्कत अशा ठिकाणी ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकांचे परदेश दौरेही झाले असून येथील सर्व प्रयोग हाऊसफुल ठरले. या नाटकाला वर्षभरात झी गौरव, झी कॉमेडी अवार्ड्स, मिफ्ता तसेच संस्कृती कलादर्पण असे एकूण १९ पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर २० डिसेंबर २०१५ रोजी सोनल प्रोडक्शन निर्मित ‘परफेक्ट मिसमॅच’ हे नाटक रंगभूमीवर आणलं गेलं. वेगळ्या विषयाचा धाडसी प्रयोग म्हणून परिक्षक आणि प्रेक्षकांकडून विशेष कौतुक झाले असून आतापर्यंत या नाटकाचे एकूण ५० प्रयोग झाले आहेत, या नाटकालादेखील ११ पुरस्कार मिळाले. तसेच सध्या गाजत असलेल्या ‘डोंट वरी बी हॅप्पी’ या नाटकाचा २५ डिसेंबर २०१५ रोजी थाटात शुभारंभ करण्यात आला. इतर नाटकांप्रमाणे या नाटकाला देखील रसिकांचे भरभरून प्रेम लाभले असून आतापर्यंत त्याचे ७५ प्रयोग झाले आहेत. या नाटकाला एकूण १३ पुरस्कार लाभले असून, यात महाराष्ट्र राज्य शासन आणि संस्कृती कलादर्पणच्या सर्वोत्कृष्ट दोन पुरस्कारांचा समावेश आहे. 
सोनल प्रॉडक्शनशी जोडल्या गेलेल्या या सर्व कलाकारांची एक माहितीपर चित्रफीत या कार्यक्रमात दाखवण्यात आली. या चित्रफितींमार्फत संस्थेने दिलेल्या दर्जेदार नाटकांच्या निर्मितीचे खुमासदार किस्से उपस्थितांसमोर मांडण्यात आले. शशांक केतकर, उमेश कामत, अमृता सुभाष, किरण माने, मंगेश कदम, प्रिया बापट, सिद्धार्थ मेनन या कलाकारांसोबतच अशोक सराफ, प्रशांत दामले, अनंत जोग या ज्येष्ठ कलाकारांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम संध्याकाळच्या प्रहरी आणखीनच बहरत गेला. विशेष म्हणजे, ‘अखियोंके झरोकेसे’ ऑर्केष्ट्राचा ‘गजलमय’ नजराणा देखील याप्रसंगी सादर करण्यात आला. या ऑर्केष्ट्रामधील अंधकलाकारांच्या सुमधुर संगीताने कार्यक्रमात जाण ओतली. 
शशांक केतकर, उमेश कामत, अमृता सुभाष, स्पृहा जोशी, किरण माने, मंगेश कदम या नामवंत कलाकारांना विशेष ओळख देणाऱ्या सोनल प्रॉडक्शनने अंशतः कालावधीतच रसिकांच्या मनात जागा मिळवली आहे. अर्थात याचे सारे श्रेय या सर्व कलाकारांना जाते. सोनल प्रॉडक्शनने अशीच यशस्वी घोडदौड करत राहावे अशा शुभेच्छा उपस्थित कलाकारांनी यावेळी दिल्या.
Gosht Tashi Gamtichi 2 Releted Photos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here